Sangli Fraud Case: पेट्रोलपंपावर सव्वा चार लाखांचा अपहार

गोटेवाडी येथील घटना; कामगारावर गुन्हा; पेट्रोल, डिझेल परस्पर विकले
fraud  case
fraud casepudhari photo
Published on
Updated on

तासगाव : गोटेवाडी (ता. तासगाव) येथील पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सुमारे ४ लाख २३ हजार ५८१ रुपये किमतीचे २ हजार ९१९ लिटर डिझेल आणि १ हजार २१८ लिटर पेट्रोल परस्पर विक्री करून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सत्यम प्रकाश पाटील (रा. हातनूर, ता. तासगाव) याच्याविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंपाचे मालक विवेक गजानन शेंडगे (रा. गोटेवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गोटेवाडी गावच्या हद्दीत 'दीपिका पेट्रोलियम' नावाचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर सत्यम पाटील हा इंधन भरण्याचे काम करत होता. १६ जून २०२६ रोजी पंपाचे व्यवस्थापक वैभव माने यांनी दैनंदिन इंधन साठ्याची तपासणी केली. त्यावेळी मीटरवरील नोंद आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये १९४ लिटर डिझेल कमी असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत ड्युटीवर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, सत्यम पाटील याने पहाटेच्या सुमारास साठवण टाकीतून इंधन काढून बाहेर परस्पर विक्री केल्याचे समोर आले. त्यानंतर पंपावरील संपूर्ण इंधनसाठा तसेच ऑटोमेशन मशिनच्या नोंदींची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत १ मे २०२५ ते १६ जून २०२६ या कालावधीत सत्यम पाटील याने २ हजार ९१९ लिटर डिझेल आणि १ हजार २१८ लिटर पेट्रोल परस्पर विकल्याचे निष्पन्न झाले.

या अपहार केलेल्या इंधनाची एकूण किंमत ४ लाख २३ हजार ५८१ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत सत्यम पाटील याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजीव केंद्रे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news