Sangli News : उमदीत विहिरीच्या पाण्यात चक्क पेट्रोलसदृश द्रव

काडी ओढताच लागली आग; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनामा
Sangli News
उमदीत विहिरीच्या पाण्यात चक्क पेट्रोलसदृश द्रव
Published on
Updated on

वसंत सावंत

उमदी : जत तालुक्यातील उमदी येथे एका विहिरीच्या पाण्यात चक्क पेट्रोलसारखा द्रवपदार्थ आढळल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. विहिरीच्या पाण्याला उग्र पेट्रोलसदृश वास येत असून, हे पाणी शेतात सोडल्यानंतर तेथे काडीपेटीतील काडी ओढली असता, लागलीच आग लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या अजब अन् गंभीर प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. घटनेची गंभीर दखल घेत महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

उमदी येथील शेतकरी महेश माळी व दुंडाप्पा माळी यांची ३० बाय ३० आकाराची सामायिक विहीर आहे. सध्या या विहिरीत सात ते आठ फूट पाणी आहे. विहिरीच्या पाण्याला गेल्या दीड वर्षापासून पेट्रोलसदृश वास येत असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी विहिरीच्या पाण्याचा वरचा थर तपासला असता त्यावर इंधनासारख्या पदार्थाचा जाड थर स्पष्टपणे दिसून आला. हे पाणी शेतात सोडल्यानंतर त्या ठिकाणी काडी ओढून पाहणी केली असता क्षणात आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच पाणी ज्या ज्या भागातून वाहिले, त्या संपूर्ण भागात आगीचा जाळ जाणवल्याचा दावाही करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्या संगीता सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मंडल अधिकारी सैपान जातगार, ग्राम महसूल अधिकारी राजू इंगळे यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान पाण्यातून उग्र पेट्रोलसदृश वास येत असल्याचे अधिकाऱ्यांच्याही निदर्शनास आले.

संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विहिरीच्या अगदी समोर असलेल्या एका पेट्रोल पंपाचीही पाहणी केली. या पेट्रोल पंपातील इंधनाची भूगर्भातून गळती होऊन ते पाणी विहिरीत मिसळत आहे का, यासह इतर सर्व तांत्रिक शक्यतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पाण्यातील या द्रवाचे नेमके स्वरूप काय आहे, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे केवळ प्राथमिक पाहणीवरून ते पेट्रोलच आहे असे निश्चित सांगता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

जनावरे दगावली, भाजीपाला जळाला

विहिरीचे सहमालक महेश माळी यांनी सांगितले की, ही आमची सामायिक विहीर असून गेल्या काही महिन्यांपासून पाण्याच्या या उग्र वासामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी माझ्या भावाच्या चार म्हशी हे दूषित पाणी प्यायल्याने दगावल्या. तसेच या पाण्यामुळे शेतात पिके येत नसून भाजीपाला पूर्णपणे जळून गेला आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष व सखोल चौकशी करून बाधित शेतकऱ्यांना तत्काळ न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

विहिरीसमोरील कूपनलिकांनाही वास

विहिरीसमोरच पेट्रोल पंप असून, अनेक कूपनलिका आणि विहिरींच्या पाण्याला पेट्रोलसदृश वास येत असल्याची माहिती सरपंच व ग्रामस्थांनी दिली आहे. याबाबत महसूल व संबंधित प्रशासनाला वेळोवेळी कळवूनही त्यांनी योग्य ती दखल घेतली नसल्याचा आरोप विहिरीचे मालक व ग्रामस्थांनी केला आहे. विहिरीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केल्यानंतरच या द्रवाचे रासायनिक स्वरूप आणि त्याचा खरा स्रोत स्पष्ट होणार आहे.

शास्त्रीय तपासणी करून न्याय द्यावा : संगीता सावंत

पंचायत समिती सदस्या संगीता बाबुराव सावंत म्हणाल्या, ‘गेल्या दीड वर्षापासून विहिरीच्या पाण्यातून उग्र वास येत आहे. यामुळे शेतीचे अपरिमित नुकसान झाले असून भाजीपाला जळाला आणि जनावरेही दगावली आहेत. शासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तज्ज्ञांमार्फत शास्त्रीय तपासणी करावी आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन न्याय मिळवून द्यावा. सध्या या विहिरीच्या पाण्यावर केवळ मका पीक काही प्रमाणात येत आहे.’

व्यापक चौकशी करून स्रोत शोधावा : सरपंच

सरपंच मुत्तू तेली म्हणाले, विहिरीच्या पाण्यात इंधनसदृश पदार्थ आढळल्याने परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील पेट्रोल पंपाच्या ५०० फुटांच्या परिसरातील अनेक कूपनलिका व विहिरींच्या पाण्यालाही उग्र वास येत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची व्यापक चौकशी करून भूगर्भातील प्रदूषणाचे नेमके कारण शोधावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news