सांगली : परमिट रूम व्यवसायाच्या नूतनीकरण शुल्कात झालेली 15 टक्के वाढ व परमिट रूममधील मद्य विक्रीवर लावलेला 10 टक्के व्हॅट रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी खाद्यपेय विक्रेता मालक-चालक असोसिएशनच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. करवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यात एक दिवस व्यवसाय बंद ठेवण्यात आला. यावेळी मद्यावरील उत्पादन शुल्कात झालेली 60 टक्के करवाढ रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. मोर्चाची सुरुवात पुष्पराज चौकातून करण्यात आली. सुरुवातीला उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. बंदमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील व्यावसायिक सहभागी झाले होते.
याबाबत जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून दरवर्षी परमिट रूम नूतनीकरण शुल्कामध्ये वाढ होत असते. यावेळी परमिट रूम नूतनीकरण शुल्कामध्ये 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ परमिट रूम व्यावसायिकांना तसेच ग्राहकांनाही परवडणारी नाही. ती रद्द व्हावी. परमिट रूम धारकांना मद्यविक्रीवर असलेला व्हॅट 5 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आला आहे. सध्या शासनाकडून देशी व विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात 60 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे परमिट रूममध्ये येणार्या ग्राहकांना ही दरवाढ परवडणारी नाही. यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. परिणामी परमिट रूम व्यवसाय करणे अत्यंत अडचणीचे झाले आहे. त्यामुळे मद्यावरील उत्पादन शुल्कवाढ रद्द करावी.
करवाढीमुळे परमिट रूममधील सर्व ग्राहक वाईनशॉप व इतर ठिकाणाहून मद्य खरेदी करून अवैध ठिकाणी मद्यसेवन करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या महसुलावरही परिणाम झाला आहे. परमिट रूमधारकांना भरमसाट शुल्क भरून सुध्दा व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. तरी परमिट रूमधारकांना यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात सोमवारी बंद पाळण्यात आला. या राज्यस्तरीय आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला आहे. आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर भडेकर, सचिव रमेश शेट्टी, मिलिंद खिलारे, धमेंद्र शेट्टी, उमेश शेट्टी, प्रशांत शेट्टी, उदय राऊत, राजेश शहा, विनायक सटाले आदी सहभागी झाले होते.