

मांजर्डे : पेड (ता. तासगाव) येथील आर्यन बाळासाहेब गलंडे (वय १४) या शाळकरी मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बसस्थानक परिसरातील जनावरांच्या गोठ्यात त्याला सर्पदंश झाला होता. बुधवारी दुपारी मिरज येथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन हा मंगळवारी रात्री कामानिमित्त बसस्थानक परिसरात असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात गेला होता. यावेळी अंधारात पायाच्या अंगठ्याजवळील बोटाला काहीतरी चावल्याची जाणीव त्याला झाली. त्याने घरी आल्यानंतर याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने हातनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला मिरज येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.
आर्यन हा गावातील हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता. सर्पदंशामुळे त्याचे आकस्मिक निधन झाल्याने पेड परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी-आजोबा आणि लहान भाऊ असा परिवार आहे.