

कुपवाड : मुसळधार पाऊस पडल्यामुळे कुपवाड शहरांमधून येणार्या चैत्रबन नाल्याचे पाणी तुळजाईनगर जिजामाता कॉलनी परिसरात राहणार्या नागरिकांच्या पटांगणात व घरात घुसले. या नाल्यातील अडथळे दूर करून नव्याने बांधलेल्या पुलाखालून त्वरित पाण्याचा निचरा करावा, या मागणीसाठी तुळजाई नगर, जिजामाता कॉलनीतील नागरिकांनी गुरुवारी सायंकाळी भरपावसात रास्ता रोको आंदोलन केले.
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मध्यस्थीनंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. लक्ष्मीनगरलगत कुपवाड फाट्यावर असलेल्या चैत्रबन नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. कुपवाड शहर, लक्ष्मी नगर, जिजामाता कॉलनी, तुळजाई नगर भागात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे चैत्रबन नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडू लागले. पुलाच्या कामामुळे चैत्रवन नाल्यावर मातीचे अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. नाल्यातून बाहेर पाणी पडून नागरिकांच्या घरात घुसण्याबरोबरच त्यांच्या घरासमोरील पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणात साचले होते. नाल्यावरील अडथळे दूर करून पाण्याचा त्वरित निचरा करावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भर पावसात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे वाहतूक सुमारे तासभर खोळंबली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहायक आयुक्त सचिन सागावकर, मुख्य स्वच्छता अधिकारी रवींद्र ताटे यांनी नागरिकांची समजूत काढून पाण्याचा त्वरित निचरा केला. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.