

पलूस ः जिल्ह्यातील पलूस व तासगाव तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे जिल्हा निरीक्षक स्वप्निल कुंजीर-पाटील यांनी तत्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
पलूस व तासगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांना धीर देत, अस्मानी संकटातून सावरण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत द्राक्षबागा, ऊस, केळी, टोमॅटो तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. शासनामार्फत लवकरात लवकर पंचनामे होऊन योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शिवसेनेकडून पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. परवा झालेल्या गारपीटीमुळे द्राक्ष पिकाचे विशेषतः मोठे नुकसान झाले असून संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.