

पलूस : अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीकडे घेऊन जाणारी पलूस नगरपरिषदेची शववाहिका रविवारी एकाच दिवशी दोन वेळा रस्त्यात बंद पडली. वाहन सुरू करण्याचे प्रयत्न करूनही यश न आल्याने अखेर नातेवाईकांना शववाहिकेतून मृतदेह खाली उतरवून नेण्याची वेळ आली.
शिवाजीनगर परिसरात राहणारे संजय राजाराम पवार यांचे रविवारी सकाळी निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांनी पलूस नगरपरिषदेच्या शववाहिकेसाठी संपर्क साधून वाहन मागवले. त्यानुसार मृतदेह शववाहिकेत ठेवून अंत्ययात्रा सुरू करण्यात आली. मात्र, पलूसलगत शववाहिका अचानक बंद पडली. .
चालकासह उपस्थितांनी वाहन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळाने वाहन दुरुस्त झाल्यानंतर अंत्ययात्रा पुढे मार्गस्थ झाली. दुपारी बाराच्या सुमारास पुन्हा एकदा शववाहिका बंद पडली. ती सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात आले; परंतु त्याला यश आले नाही. अखेर पर्यायी व्यवस्था करून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला