

पलूस : येथील 'साई साडी सेंटर व किड्स वेअर' या कापडाच्या दुकानाला गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधीचे साहित्य जळून खाक झाले. महावितरणच्या विजेच्या शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा संशय दुकान मालक इंद्रजित शिवाजी पवार (वय ३७, रा. नागराळे, ता. पलूस) यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
इंद्रजित पवार यांनी पत्नी पल्लवी पवार यांच्या नावावर पलूस येथे हे कापड दुकान सुरू केले होते. तेथून साड्या, किड्स वेअर, हँडलूम साहित्याची घाऊक व किरकोळ विक्री केली जात होती. २३ सप्टेंबर रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शेजारील दुकानदाराने पवार यांना फोन करून, दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अग्निशमन दलाची दोन वाहने आग आटोक्यात आणण्याचे काम करत होती. या आगीत २४ प्लायवूड कपाटांमधील साड्या व कपड्यांचा साठा पूर्णतः जळून खाक झाला. तसेच सहा काऊंटर, काचेचे डिस्प्ले, संगणक, प्रिंटर, रोख रक्कम, खरेदी-विक्रीची बिले, बँक पासबुक, फायली आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य भस्मसात झाले. जळालेल्या मालमत्तेत अंदाजे कपडे, काऊंटर, तसेच इतर साहित्य व उपकरणे, असे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
स्मार्ट मीटरच्या तांत्रिक अडचणींमुळेच दुर्घटना : पवार
दुकानात बसवलेल्या नवीन स्मार्ट मीटरनंतर सातत्याने हाय व्होल्टेज, स्पार्किंग आणि वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. याबाबत १ जून आणि २२ जुलै रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. तसेच पूर्वी प्रिंटर व संगणक जळाल्याचेही निदर्शनास आणले होते. महावितरणने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दुकान मालक इंद्रजित पवार यांनी केली आहे.