सांगली : विटा-मायणी रस्त्यावरील तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू
विटा, पुढारी वृत्तसेवा : विटा-मायणी रस्त्यावर दोन चारचाकी वाहन आणि एक दुचाकी गाडी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. रामचंद्र यादव (रा.कडेपूर) असे मृताचे नाव आहे. त्यांचा सांगलीत उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अद्याप या अपघाताची विटा पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, विटा-मायणी रस्त्यावर दोन चारचाकी वाहन आणि एक दुचाकी गाडी यांच्यात विचित्र अपघात झाला. रामचंद्र यादव हे पत्नी सुनंदासह दुचाकीवरुन मायणीकडे निघाले होते. त्यांना मागून येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकी पुढे सरकत येणाऱ्या पुढे असणाऱ्या गाडीवर आदळली. त्यामुळे गाडीतले दोघेजण जखमी झाले, तर रामचंद्र यादव यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

