

सांगली : सांगलीतील शांतीबन चौकातील नर्सरीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या निकिता शिव मनगुळे- लोंढे तिचा पती अद्याप पसारच आहे. त्याच्या मागावर विश्रामबाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.
शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सांगली-धामणी रस्त्यावरील शांतीबन चौकात असणाऱ्या नर्सरीमधील शेडला लागलेल्या आगीत निकिता मनगुळे-लोंढे या महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महिलेचा पती शिव मनगुळे-लोंढे हा पसार झाला आहे. त्याने मोबाईल बंद केल्याने त्याचा शोध घेण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. आता या प्रकरणाचा विश्रामबाग पोलिसांनी खुनाच्या दृष्टीनेच तपास सुरू केला आहे. या घटनेपूर्वी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले होते, अशी नवी माहिती समोर आली आहे. तसेच मूल होत नसल्याच्या कारणातून दोघांत वारंवार भांडण होत असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच कारणातून शिव याने निकिता हिला जाळून मारले का? यादृष्टीने तपास केला जात आहे. शिव मनगुळे- लोंढे याला अटक केल्यानंतर या प्रकरणातील नेमके कारण समोर येणार आहे.