

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणीही राजकारणाची पातळी सोडू नये आणि सर्व हेवेदावे बाजूला ठेवावेत. सध्या बँक बिनविरोध करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विशाल पाटील यांनी मांडली. तसेच जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहता, पालकमंत्र्यांनी आचारसंहितेचे नियम बाजूला ठेवून तातडीने लोकप्रतिनिधींची आढावा बैठक बोलावण्याची मागणीही केली.
खासदार पाटील म्हणाले, जिल्हा बँकेकडे केवळ राजकारणाच्या माध्यमातून पाहू नका. येथे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि गरजू महिलांचे हित जपण्यासाठी अनुभवी व तरुण नेतृत्व आले पाहिजे, जेणेकरून बँकेचा कारभार अधिक पारदर्शक चालेल. ही बँक सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करून सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाला मोठा आधार देते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आतषबाजीबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाने आपल्याकडील साधनसामग्रीचा कसा वापर करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.