Sangli Accident: ट्रॉली उलटून नऊ ऊसतोड मजूर जखमी
कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गवर कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना घेऊन शिरोळकडे निघालेल्या ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरने ट्रॉलीसकट पुढे निघालेल्या मोटारीस मागून जोरदार धडक दिली. अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीतील ऊसतोड मजूर आणि चालक असे 9 जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवार (दि. 28) रोजी सकाळी 11 वाजता घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कारेगव्हाण (जि. बीड) येथील महादेव वैजनाथ खंदारे (वय 40) हे ट्रॅक्टरला (एमएच 44 डी 4868) ट्रॉली जोडून ऊसतोड मजुरांना घेऊन बीडहून नागजमार्गे शिरोळकडे येत होते. दरम्यान, कुची गावच्या हद्दीत हॉटेल ए.पी. बारसमोर त्यांच्या ट्रॅक्टरचा ब्रेक अचानक निकामी झाला. यामुळे अनियंत्रित झालेल्या ट्रॅक्टरची मिरजच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीस (एमएच 10 एन 5218) पाठीमागून जोरदार धडक बसली.
अपघातात ट्रॅक्टर चालक महादेव वैजनाथ खंदारे (वय 40), बाबुराव आत्माराम खंदारे (27), विश्रांती बाबुराव खंदारे (25), केशव बाबुराव खंदारे (07), विलास मच्छिंद्र खंदारे (25), शारदा विलास खंदारे (21), स्वाती बाळू खंदारे (10), उमेश आत्माराम खंदारे (22) आणि सुरेश अभिमान खंदारे (25, सर्व रा. कारेगव्हाण, ता. बीड, जि. बीड) जखमी झाले.
महामार्ग पोलिस दलाकडील उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे, हवालदार मनोज टोणे, किरण भिसे, जोतिबा माने यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिकेतून कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील विश्रांती बाबुराव खंदारे आणि स्वाती बाळू खंदारे या गंभीर जखमी आहेत. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

