

शिराळा : शिराळा येथून भटवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमआयडीसी परिसरातील गारमेंटसमोर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. यशोदा अशोक चव्हाण (वय ५५, रा. भटवाडी, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी दुचाकी चालक सचिन रामचंद्र खोत (रा. भटवाडी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक पांडुरंग महादेव नामदास (वय ३७, रा. कुरभावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिराळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ मे रोजी सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास सचिन खोत हे यशोदा चव्हाण यांच्यासह दुचाकीवरून जात होते. शिराळा एमआयडीसी येथील तेजस्विनी गारमेंटजवळ समोरून ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक ट्रक वळवला. यावेळी ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेमुळे दुचाकीवरून खाली पडल्याने यशोदा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुचाकी चालक सचिन खोत हे देखील किरकोळ जखमी झाले. अपघाताची नोंद शिराळा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सर्फराज मुल्ला पुढील तपास करत आहेत.