

ॲड. शिवाजी कांबळे
सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात कारवाईचा धडाका लावला आहे. सांगली जिल्ह्यात मात्र तशी कारवाई होताना दिसत नाही. गुटखा व माव्याची विक्री खुलेआम तर गांजाची विक्री चोरीचुपके होतच आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनीच आता पुढाकार घेऊन दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
भेसळयुक्त पदार्थाबद्दल कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला आहेत, तर गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व गांजासारख्या बंदी असलेल्या वस्तू सेवन करणे, बाळगणे व विक्रीबद्दल कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. एकीकडे लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने शासन चांगले निर्णय घेत आहे. नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे धडाकेबाज कारवाई करत आहेत तर दुसरीकडे मात्र अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून तशी कारवाई होताना मात्र दिसत नाही. कारण अजून देखील काही ठिकाणी खुलेआम तर काही ठिकाणी चोरीचुपके बंदी असलेल्या विविध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे.
शासनाने गुटखा, सुगंधी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. तसेच गांजा हा पदार्थ अमली पदार्थ समजला जात असल्याने शासनाने गांजावर देखील बंदी घातली आहे. मावा बनवत असताना बहुतांशी पानपट्टी धारकांकडून सुगंधी तंबाखू वापरतात. तसेच काही पानपट्टीधारक मावा कडक व्हावा यासाठी माव्यामध्ये गांजाचे पाणी वापरतात. शासनाने सुगंधी तंबाखू व गांजावर बंदी घातली असताना त्याचा सर्रास वापर केला जातो. मात्र त्याबद्दल कारवाई होताना दिसत नाही.
राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. जिल्ह्यासाठी सांगली मार्केट यार्ड परिसर व मिरज शहर या परिसरात गुटख्याचे केंद्र मानले जाते. काही राजकीय नेते व परप्रांतीय व्यापारी हे या केंद्राचे प्रमुख असल्याचे समजते. यापूर्वी झालेल्या कारवाईमध्ये बेकायदा गुटखा विक्रीप्रकरणी कोट्यवधी रुपयाचा दंड झालेला आहे. अशा व्यक्तींसह काही गुटखा विक्री पेडलर देखील जोमाने काम करताना दिसतात. या दोन केंद्रातून संपूर्ण जिल्ह्यात गुटखा विक्री होत असल्याचा आरोप आहे. या पेडलरना वरिष्ठ राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप आहे.
जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. तरुण विशेषत: अल्पवयीन मुले गांजा ओढून दिवसाढवळ्या खून व मारामाऱ्या करत आहेत. जिल्ह्यात घडलेल्या अनेक खून व मारामारी या गांजा ओढल्यानंतरच झालेले आहेत. म्हणजेच गांजाच्या अमलातच बहुसंख्य खून व मोठे गुन्हे घडले आहेत. दारूमुळे व्यक्तीच्या शरीरावरील तोल जातो, परंतु गांजामुळे संबंधित व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बधीर झालेला असतो. त्या बधीर झालेल्या अवस्थेमध्ये व्यक्ती काय करेल याचा नेम नाही. गांजा ओढणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची भीती अथवा फिकीर नसते. पूर्वी गांजा विक्री किरकोळ स्वरुपात असायची परंतु आता गल्लोगल्ली गांजा ओढणारी १४ ते २२ या वयोगटातील मुले दिसतात. हा गांजा इतक्या सहजासहजी कसा उपलब्ध होतो याचा तपास होणे आवश्यक आहे.
निर्जनस्थळी गांजा ओढला जातो
महापालिका क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात सर्वत्र गांजा ओढणाऱ्या व्यक्ती दिसून येतात. यामध्ये अल्पवयीन मुले व तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहरातील निर्जनस्थळी, अडोसा असणाऱ्या ठिकाणी, अंधार असलेले ठिकाणी, जिथे लोकांची वर्दळ नाही अशा ठिकाणी गांजा ओढला जातो. सांगली शहरात वाल्मिकी आवास योजना, शामरावनगर, संजयनगर, रामकृष्णनगर, १०० फुटी रोड, कुपवाड हा गांजा ओढणाऱ्यांसाठीचा डार्क स्पॉट समजला जातो.