

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ड्रायपोर्ट, लॉजिस्टिक पार्क, मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, कृषी विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय, हळद संशोधन केंद्र, विमानतळ, विविध ठिकाणी एमआयडीसी, मोठे उद्योग आणू... अशा अनेक घोषणा काही वर्षांत केल्या आहेत. सांगली चांगली करू... असेही आश्वासन देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने महायुतीला विशेषत: भाजपच्या बाजूने कौल दिला आणि विधानसभेला आठपैकी पाच आमदार महायुतीचे निवडून दिले.
तरीसुद्धा जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालेले नाही. अपवाद वगळता, घोषणांची अंमलबजावणीही झाली नाही. त्यामुळे या घोषणांची अंमलबजावणी कधी होणार? अनेक रखडलेली कामे पूर्ण कधी होणार? सांगलीचा विकास कधी होणार? असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला, ऊस, हळद पिकांचे मोठे क्षेत्र आहे. जिल्ह्यात प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून या पिकांच्या वाढीला मोठी चालना दिली. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. सांगलीची द्राक्षे जगाच्या बाजारपेठेत जातात, द्राक्षापासून बेदाणा उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. येथील गुणवत्तेच्या डाळिंबांचीही मोठी निर्यात होते. सांगलीची राजापुरी हळद प्रसिद्ध आहे. हळदीसाठीची येथील बाजारपेठ ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.
येथील यार्डात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून मोठी आवक होते. हळदीसाठी सांगली प्रसिद्ध असल्याने सांगलीची ‘यलो सिटी’ म्हणून ओळख निर्माण करण्याचा आणि ब्रँड तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. हळद म्हणजे सांगली, अशी चर्चा होत असताना, केंद्र व राज्य सरकारने हळद संशोधन केंद्र हिंगोलीला दिले. काही दिवसांपूर्वी येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी, हळद संशोधन उपकेंद्र सांगलीत करू, अशी घोषणा केली, मात्र हालचाली नाहीत. द्राक्षासाठी नाशिक, तर डाळिंबासाठी सोलापूरला क्लस्टरला मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यात एक लाख 5 हजार द्राक्ष बागायतदार आहेत. सुमारे 33 हजार हेक्टरवर द्राक्षाचे क्षेत्र आहे, मात्र द्राक्ष बागायतदार अडचणीत आहेत. त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने ते आता दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित होण्याची भाषा करीत आहेत. पूर्व भागात टेंभू, म्हैसाळ, ताकारीचे पाणी जात आहे. त्यामुळे या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारने क्लस्टरसारखी एखादी योजना राबवल्यास या पिकाच्या वाढीस व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळू शकते. मात्र त्यासाठी प्रयत्न होत नाहीत. दुसऱ्या बाजूला राज्यात दहा ठिकाणी क्लस्टरला निधीची तरतूद झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये, भाजपला साथ द्या, सांगली चांगली करू, असे आश्वासन येथील सभेत दिले होते. त्याप्रमाणे जिल्ह्याने खासदार, आमदार निवडूनही दिले. मात्र, मोठा उद्योग व क्लस्टरसारखी कसलीच योजना आली नाही. केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे. जिल्ह्यातून पाच आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. ना. चंद्रकांत पाटील पुन्हा पालकमंत्री आहेत. यापूर्वी पालकमंत्री असताना त्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या, अंमलबजावणी नाहीच. विकासाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जिल्ह्यातील नेत्यांची चर्चा झाली आहे, असे पाहायला मिळत नाही. अनेक दिवसानंतर मुख्यमंत्री फडणवीस सांगलीत येत आहेत. त्यामुळे आता तरी ते याआधी केलेल्या घोषणांबाबत काय बोलतात, याची उत्सुकता आहे.