

सांगली : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात वाळवा तालुक्यातील 989 शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. हा महामार्ग रद्द करण्याची मागणी सोमवारी वाळवा तालुका शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकल्पामुळे वाळवा तालुक्यातील 852 एकर सुपीक बागायती शेती बाधित होणार असून हजारो शेतकरी भूमिहीन व बेघर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी शेतकऱ्यांच्या हरकती स्वीकारल्या, शासनाकडे म्हणणे सादर करू, असे आश्वासन दिले. मसुचीवाडी, बोरगाव, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, ईश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, ईटकरे, येलूर, कुरळप आणि ऐतवडे खुर्द या गावांतील शेतकरी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे कृष्णा व वारणा नदी परिसरातील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दोन नद्यांमधील पट्ट्यातून प्रस्तावित मार्ग जात असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन अधिक धोक्यात येईल. या परिसरातील बहुतांश शेती बागायती स्वरूपाची आहे. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन नदी उपसा सिंचन योजना, पाईपलाइन, विहिरी आणि बोअरवेल उभारल्या आहेत. महामार्गामुळे या सिंचन सुविधा उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. शेती कोरडवाहू बनण्याची भीती आहे.
प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील, तर काही कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. तसेच चांदोली धरण, अभयारण्य आणि राष्ट्रीय महामार्गासाठी यापूर्वीही जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ येत आहे. सामाजिक व पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास न करता प्रकल्प राबविला जात आहे. तो तत्काळ रद्द करण्यात यावा. यावेळी शामराव पाटील, विजय पाटील, शहाजी पाटील, सचिन जाधव उपस्थित होते.