

नंदू गुरव
सांगली : आधार कार्ड आणि एक फोटो घेऊन केंद्रावर जायचं, एक साधा अर्ज भरायचा आणि मतदार पुनरिक्षण करून घ्यायचं... फक्त एका मिनिटाचं काम आहे, पण ते मतदारांनीच गांभीर्यानं घेतलेलं नाही. चालढकल कराल तर मतदानाच्या हक्काला मुकाल, अशी वारंवार सूचना देऊनही मतदार जागा होत नाही, परिणामी या महत्त्वाच्या मोहिमेला वेग येताना दिसत नाही. अशी काही मोहीम सुरू आहे आणि ती महत्त्वाची आहे याची माहितीच मतदारांना नसल्यासारखी परिस्थिती आहे आणि गरज आहे, ती या मोहिमेच्या प्रचार आणि प्रसाराची.
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात ही मोहिम २९ जूनपासून सुरु झाली आहे आणि ती २९ जुलैपर्यंत चालणार आहे. या मोहिमेतंर्गत मतदार यादीतले बोगस, मयत, स्थलांतरीत, दुबार झालेले मतदार काढून नवीन पात्र लोकांची नावं घेतली जाणार आहेत. या यादीवरुनच मतदारांची प्रारुप यादी तयार केली जाणार असल्यानं ही नोंद होणं मतदारांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. पण याचं गांभिर्य पटवून देण्यात यंत्रणा सक्रिय होताना दिसत नाही ना मतदार गंभीर होताना जाणवत नाही.
यंत्रणेला सहकार्याची गरज
जिल्ह्यातील २५ लाख ७३ हजार ३३९ मतदारांपैकी २२ लाख ३८ हजार २५८ (८६.९८ टक्के) मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. अभियानासाठी ८ मतदार नोंदणी अधिकारी, ११९ सहायक मतदार नोंदणी अधिकारी, २४९ बीएलओ पर्यवेक्षक व २,४८२ बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. अशी सारी यंत्रणा तैनात असली तरी मतदारांनीही जागरुकता दाखवण्याची गरज आहे.
मतदारांची काही जबाबदारीच नाही का?
या कामासाठी बीएलओ हे तीन वेळा मतदारांच्या घरी येऊन नवीन पात्र लोकांची नावे नोंदवून घेणार आहेत. बीएलओ तुमच्या घरी ३ वेळा येईल. तेव्हाही तुम्ही भेटला नाहीत आणि फॉर्म भरला नाही तर दारावर नोटीस चिकटवली जाईल. त्यानंतरही संपर्क नाही झाला, तर फॉर्म भरण्याची संधी जाईल.
जागरूक मतदार म्हणून जबाबदारी
घरोघरी जाऊन असे अर्ज भरून घेण्यात बीएलओना अडचणी येत आहेत. तीन तीनदा हेलपाटे मारूनही कुणी भेटत नाही, नाव नोंदणीपेक्षा घरोघरी फिरण्यातच सारा वेळ जातो आहे, पावसात अर्जांचा गठ्ठा घेऊन फिरणं शक्य होत नाही... अशा अडचणी बीएलओ सांगत आहेत. बीएलओ घरी येणार म्हणून मतदारही केंद्रापर्यंत जायला तयार नाहीत. एका मिनिटात जर इतकं महत्त्वाचं काम होत असेल तर मतदारांनीही केंद्रापर्यंत जाऊन मोहिमेत योगदान द्यायला काय हरकत आहे? असा सवाल जागरूक मतदार विचारत आहेत.