Vedant Bandgar Murder Case : नीलेश गडदेचा साथीदार गजाआड

गडदेच्या पोलिस कोठडीत वाढ : अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी
Vedant bandgar murder case
Vedant bandgar murder case
Published on
Updated on

सांगली : बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या घरावर ‘वॉच’ ठेवणाऱ्या नीलेश गडदे याच्या साथीदाराच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. संदेश उर्फ सँडी रामचंद्र घागरे (वय २३, रा. ढालगाव) असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलासही ताब्यात घेऊन त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्य सूत्रधार नीलेश विठोबा गडदे याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचा साथीदार अतुल वायदंडे याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आणखी एक साथीदार सागर चौगुले याने विषारी द्रव प्राशन केल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर किरण लोखंडे, विशाल चौगुले यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरग येथील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटात वाद होता. खरात यांनी हे काम सोडावे, म्हणून संशयित नीलेश गडदे दबाव आणत होता. बुधवार, दि. १० जून रोजी रात्री गडदे दोन साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. खरात हे घरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून गडदेने खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल एकत्र जमले. या दरम्यान संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली.

बंडगर घरी नसल्याने नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. यादरम्यान बंडगर यांच्या घरावर संशयित संदेश घागरे हा नजर ठेवत थांबला होता, अशी माहिती समोर आल्याने त्यास अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील अल्पवयीन साथीदारांची सुधारगृहात रवानगी केली आहे. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. ‘एलसीबी’चे निरीक्षक संजीव झाडे अधिक तपास करत आहेत.

विशाल चौगुलेने दिले पिस्तूल

नीलेश गडदे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. हे पिस्तूल संशयित विशाल चौगुले याने दिल्याचे त्याने सांगितले. चौगुले अद्यापही पसार असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर पिस्तूल कोठून आणले, याची माहिती मिळेल.

तोडफोड झालेली गाडी जप्त

नीलेश गडदे याने खरात यांच्या घरात घुसून धमकी देत खंडणी मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संतप्त जमाव जत पोलिस ठाण्यासमोर आला. त्यानंतर गडदे याची गाडी त्याठिकाणी आली होती. जमावाने त्याच्या गाडीची तोडफोड केली होती. ती गाडी आता पोलिसांनी जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news