Vedant Bandgar Murder Case|कुटुंबातील चौदाजणांसह आत्मदहनाचा इशारा

बाळासाहेब बंडगर : आमचा खून करण्यासाठी नीलेश गडदेला सुपारी; राजकीय सूत्रधाराला शोधून काढा
Vedant Bandgar Murder Case
बाळासाहेब बंडगर
Published on
Updated on

गणेश मानस

सांगली : मी व माझा मुलगा मारुती आम्ही दोघेही घरी नसताना ११ जूनरोजी गुंड नीलेश गडदे याने घरी येऊन दहशत माजवली. माझा नातू वेदांत बंडगर याचा डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून केला. वास्तविक पाहता मला व माझा मुलगा आम्हा दोघांना मारण्यासाठी कोणीतरी सुपारी दिल्याचा संशय आहे. आम्ही घरी नसल्यामुळे चिडूनच नीलेशने माझ्या नातवाचा खून केला आहे. या मागे राजकीय सूत्रधाराचा हात असल्याचा आमचा संशय आहे. त्याचा तातडीने शोध घ्यावा, अन्यथा आमच्या कुटुंबातील १४ सदस्य आत्मदहन करतील, असा इशारा हमाल पतपेढीचे अध्यक्ष व हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केला.

वेदांत बंडगर याचा खून झाल्यानंतर बाळासाहेब बंडगर व त्यांचे कुटुंबीय दु:खात आहेत. बुधवारी त्यांची हमाल पंचायतच्या कार्यालयात भेट घेतली. ते म्हणाले, वेदांतचा निर्घृण खून झाला. त्याला अटक झाली आहे. परंतु याचा अद्याप तपास खोलात जाऊन करणे आवश्यक आहे. परंतु तपासामध्ये पहिल्यापासूनच राजकीय दबाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा तपास सांगली पोलिसांकडून काढून तो एसआयटीमार्फत करावा, अशी आमची मागणी आहे.

नीलेशचा मालधक्क्यात शिरण्याचा प्रयत्न

बाळासाहेब बंडगर म्हणाले, मिरज तालुक्यातील मालधक्क्यावर १०५ हमाल काम करीत आहेत. यावर हमाल पंचायततर्फे बाज येथील लक्ष्मण खरात हे मुकादम म्हणून काम करतात. खरात यांना दाजी गडदे याने फोन करून मुकादमपद सोड, असे सांगितले. यासंदर्भात चर्चेसाठी २६ मे २०२६ रोजी दुपारी सांगलीतील दाजी गडदे याच्या घरी बैठक ठेवली. त्या ठिकाणी खरात यांना बोलावण्यात आले. त्या ठिकाणी अशोक गडदे, देवाप्पा कोंडिगीरे, सदाशिव बंडगर, सचिन गावडे, अजित दुधाळ आले होते. नंतर नीलेश गडदे व किरण लोखंडे त्या ठिकाणी आले. या सर्वांनी लक्ष्मण खरात यांना मुकादमपद सोड, नाही तर १० लाख रुपये दे, अशी मागणी केली. त्यावर खरात त्यांना ‘विचार करून सांगतो’, असे सांगून परत आले. त्यानंतर खरात यांना वारंवार फोन करून १० लाखांची मागणी सुरूच होती. शेवटी १० जूनरोजी लक्ष्मण खरात यांच्या जत तालुक्यातील बाज येतील घरी नीलेश गेला. लक्ष्मण यांच्या पत्नीवर पिस्तूल रोखून धमकी दिली. त्यानंतर गावातील अहिल्यादेवी होळकर चौकात जाऊन गोळीबार करून त्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण खरात यांनी घडलेल्या घटनेची माहिती हमाल संघटनेचा नेता असल्याने मला व माझा मुलगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर यांना सांगितली.

११ जूनरोजी सकाळी सर्वजण जत येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मालधक्क्यावर काम करणारे हमालही होते. परंतु पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तक्रार घेण्यात टाळाटाळ केली. त्याचवेळी दाजी गडदे, संभा माने, अजित दुधाळ, हणंमत खरात, काशिलिंग खरात, अंकुश गडदे, भारत गडदे, आकाराम कचरे हे आठजण पोलिस ठाण्यात आले. त्यांनी मला ‘तुम्ही या ठिकाणाहून जावा, नाहीतर नीलेश गडदेला बोलावून घेतो’, अशी धमकी दिली.

नीलेश यानेही फोन करून मला धमकी दिली. त्यानंतर नीलेश व त्याचे साथीदार पोलिस ठाण्यासमोर आले. त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर तेथे असलेले हमालांशी नीलेश आणि त्याच्या साथीदारांनी हाणामारी सुरू केली. यावेळी नीलेशच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यानंतर नीलेश त्या ठिकाणाहून निघून गेला. सायंकाळी आम्ही सांगली येथील घरी निघालो. परंतु त्या अगोदरच नीलेश व त्याचे साथीदार सांगली येथील माझ्या घरी पोहोचले. त्यांनी माझा नातू वेदांत याचा गोळी घालून खून केला.

खून केल्यानंतर नीलेशला आसरा कोणी दिला

बंडगर म्हणाले, वेदांत याचा खून केल्यानंतर नीलेश फरार झाला. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तो कर्नाटकातील एका लॉजवर मैत्रिणीबरोबर सापडल्याचे सांगितले जात आहे. परंतु या दोन दिवसाच्या कालावधीत त्याला कोणी आसरा दिला हे पोलिसांनी शोधून काढल्यास सूत्रधार हाती लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news