

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील नांगरेमळा, भिंगेवाडी, लिंगे वस्ती, पिंजार वस्ती आणि साठे नगर परिसराला रविवारी अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्याने झोडपून काढले. या ढगफुटीसदृश पावसामुळे डाळिंबाच्या बागा जमीनदोस्त झाल्या. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांवरील फळे गळाली असून, अनेक ठिकाणी डाळिंबाची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.
आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी सोमवारी सकाळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत बांधावर जाऊन पाहणी केली. आमदार बाबर म्हणाले, शेतकरी संकटात असताना शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत व योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा केला जाईल. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दौऱ्यात जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, दत्तात्रय पाटील, नगरसेवक अमरसिंह पाटील, युवासेना तालुकाप्रमुख मनोज नांगरे, रामचंद्र नांगरे, रावसाहेब सागर, मारुती हजारे, संतोष नांगरे, कृषी अधिकारी मारुती कौलगे, तलाठी विनायक पाटील उपस्थित होते.
वाऱ्याने जनावरांचा घेतला बळी
वाऱ्यामुळे लिंगेवस्ती येथील संजय लिंगे यांची म्हैस आणि जैबून मलखान शेख यांची शेळी झाड कोसळून दगावली. तर साठेनगर येथील रविराज लांडगे यांचा घोडा भिंतीत उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे मृत्युमुखी पडला. या दुर्घटनेत व पशुहानीमुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, 20 ते 25 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शहरातील 20 हून अधिक घरांचे पत्रे उडाले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत.