

हरिपूर : येथील शिवा काशीद चौक परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत खासगी हायस्कूल असल्याने दररोज सकाळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र खड्डेमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी शाळेत वेळेत पोहोचण्याच्या घाईत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा या रस्त्यावर तोल जाऊन अपघात झाला. या अपघातात दोघांच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चार ते पाच वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. या काळात अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शैक्षणिक परिसर असल्याने या रस्त्यावर विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर यांनी लक्ष घालावे आणि या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी पालक, ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे. या रस्त्यावरील वाहतूक पाहता विशेषतः विद्यार्थ्यांची ये-जा पाहता या रस्त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज मोठी आहे. मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहू नये.