

सांगली : येथील कॉलेज कॉर्नर बसथांबा परिसरातील एका मोठ्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या. संबंधित झाडामुळे धोका निर्माण झाल्याचे कारण देत महापालिकेने ही कार्यवाही केली. मात्र, या कारणाबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची भूमिका परस्परविरोधी असल्याकडे नागरिकांकडून लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या या स्पष्टीकरणावर नागरिक साशंकता व्यक्त करत आहेत.
परिसरात सुरू असलेल्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामादरम्यान झाडाच्या मुळ्यांना धक्का बसल्याने झाड धोकादायक बनले होते, त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने त्याच्या फांद्या तोडण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित कामाच्या ठेकेदाराने या ठिकाणी केवळ नऊ इंच खोदकाम करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे इतक्या मोठ्या आणि जुन्या झाडाच्या मुळ्यांवर त्याचा कितपत परिणाम झाला असेल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणच्या बसथांब्याचे नुकसान करून तो हटविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती. आता त्याच परिसरातील झाडावर कारवाई झाल्याने या दोन्ही घटनांचा परस्परसंबंध आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. झाड खरोखरच धोकादायक झाले होते का आणि त्याचे कोणतेही तांत्रिक परीक्षण झाले होते का, असे अनेक प्रश्न आहेत.