

सांगली : एकाचवेळी शहरातील तीन-तीन रस्ते बंद ठेवण्याचा आडमुठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे शेकडो वाहनधारक आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शहरात वाहतुकीचा आधीच बोजवारा उडालेला असताना, प्रशासनाने एकाचवेळी तीन महत्त्वाचे मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीकरांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सांगली-माधवनगर ते कुमठा फाटा या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. साखर कारखाना ते चिंतामणीनगर रेल्वे पूल तसेच पुढे बायपास चौक ते कॉलेज कॉर्नर या टप्प्यात गेल्या अनेक दिवसांपासून हे काँक्रिटीकरण सुरू आहे. पण कासवगतीने चाललेल्या या कामामुळे सध्या वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पण, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावायचे बाजूला ठेवून प्रशासनाने त्यात आणखी घोळ घालून ठेवला आहे.
पूल बांधकामाच्या निमित्ताने जुना कर्नाळ रस्ताही सध्या बंद आहे. शिवशंभो चौकातून सांगलीत येणाऱ्या प्रचंड वाहतुकीची यामुळे आणखीन घुसमट होत आहे. त्यातच आता पंचशीलनगर येथील जुना बुधगाव रस्त्यावरील वाहतूकही बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी पंचशीलनगरचे रेल्वे फाटक पुढील तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केली आहे. या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाचे काम करण्यात येणार असून 25 मेपासून वाहतुकीसाठी तीन महिने हा मार्ग पूर्णतः बंद राहणार आहे. या निर्णयामुळे सांगलीच्या उत्तरेकडील गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. शहरात प्रवेशासाठी त्यांना मोठा वळसा घालावा लागणार असून प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्चही वाढणार आहे. या प्रकारामुळे वाहतूकदारांमध्ये तीव्र संताप आहे.
कोंडीत कोंडी
पंचशीलनगर आणि जुना कर्नाळ रस्ता बंद राहिल्याने वाहतुकीचा सर्व भार चिंतामणीनगर पुलावर पडणार आहे. मात्र, या मार्गावरही सध्या काँक्रिटीकरण सुरू असल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याची शक्यता आहे. सध्या कॉलेज कॉर्नर ते माधवनगर जकात नाका परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत आणखी एक महत्त्वाचा मार्ग बंद केल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. कॉलेज कॉर्नर ते कुमठा फाटा रस्ता पूर्ण होईपर्यंत जुना बुधगाव रस्ता बंद करू नये, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.