Sangli News : मणेराजुरी, उपळावीत चोरट्यांचा धुमाकूळ

चोरलेली दुचाकी टाकून चोरटे पसार
House Burglary
House BurglaryPudhari
Published on
Updated on

तासगाव : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी आणि उपळावी येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मणेराजुरी येथे घरफोडी करून गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला महिलेने धाडसाने प्रतिकार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दुसऱ्या घटनेत उपळावी येथे घरातून मोबाईल लंपास केल्यानंतर चोरलेली दुचाकी चालू न झाल्याने चोरट्यांनी ती वाटेतच सोडून पलायन केले.

मणेराजुरी येथे मंगळवारी रात्री चोरट्याने एका घरात मागील दारातून प्रवेश केला. घरातील लोक झोपलेले असताना, चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील दागिना ओरबाडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी संबंधित महिलेला जाग आली. तिने प्रसंगावधान राखत दागिना दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवला आणि आरडाओरडा सुरू केली. यामुळे घाबरलेल्या चोरट्याने हाताला लागेल तेवढाच दागिन्याचा तुकडा खेचला आणि पळ काढला. महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे मौल्यवान दागिना पूर्णपणे चोरीला जाण्यापासून वाचला.

उपळावी येथेही चोरट्यांनी एका घरात घुसून मोबाईल चोरला. घरात चोर आल्याची चाहूल लागताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी घरातून पळ काढला. पळून जाताना चोरट्यांनी दारात उभी असलेली दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना दुचाकी सुरू करता आली नाही. अखेर त्यांनी दुचाकी उपळावी ते कवठेएकंद रस्त्यावरच टाकून पोबारा केला. बुधवारी सकाळी गावातील काही तरुण नेहमीप्रमाणे फिरायला (मॉर्निंग वॉक) गेले असता, त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेली दुचाकी दिसून आली. चौकशीअंती ती रात्री चोरीला गेलेली दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले. या घटनांमुळे दोन्ही गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

logo
Pudhari News
pudhari.news