

सांगली : महावितरण कंपनीने शेतीसाठीच्या वीज पुरवठ्यात अचानक दोन तासाची कपात केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. येत्या दोन दिवसात वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत न झाल्यास आणि सक्तीने स्मार्ट मीटर बसवणे बंद न केल्यास सांगली येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाला घेराव घालून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिला आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन संघटनेच्यावतीने अधीक्षक अभियंता आशिष मेहता यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या उन्हाचा पारा 40 अंशावर असतानाही शेतकरी ऊस, केळी, भाजीपाला ही उभी पिके जगवण्यासाठी धडपडत आहेत. त्यातच सध्या सोयाबीनची पेरणी व टोकण सुरू आहे. आधीच विविध कारणांमुळे शेतकरी
अडचणीत असताना महावितरणने 8 तासांऐवजी 6 तास वीज देऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हा हंगाम वाया गेल्यास शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि याचा थेट परिणाम खाद्यतेल उत्पादनावरही होईल, अशी भीती संदीप राजोबा यांनी व्यक्त केली. तसेच, ग्रामीण भागात पूर्वसूचना न देता सक्तीने सुरू असलेले स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तत्काळ थांबवण्याची मागणीही त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संजय खोलकुंबे, सुरेश वसगडे, अभिजित पाटील, नामदेव वडेर, वैभव मद्वाण्णा, महावीर मोळाज उपस्थित होते.