

शिराळा शहर :शिराळा नगरपंचायतीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीत समाधानकारक प्रगती करत आर्थिक पाठबळ उभे केले आहे. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आदी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी कर वसुली हा नगरपंचायतीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे.
नगरपंचायतीच्या कर विभागाच्या आकडेवारीनुसार, मालमत्ता कराची एकूण मागणी १ कोटी ४१ लाख ७५ हजार २३० रुपये होती. त्यापैकी ८२ लाख १७ हजार ४९ रुपयांची वसुली करण्यात आली असून एकूण वसुलीचे प्रमाण ६४.५३ टक्के आहे. थकीत मालमत्ता कराची मागणी ७० लाख ९५ हजार ७४४ रुपये असून त्यापैकी २४ लाख ७२ हजार ३४३ रुपये वसूल झाले आहेत. चालू वर्षाच्या ७० लाख ७९ हजार ४८६ रुपयांच्या मागणीपैकी ५७ लाख ४४ हजार ७०६ रुपयांची वसुली झाली आहे. पाणीपट्टी कराच्या बाबतीत एकूण ७९ लाख ५० हजार ३६३ रुपयांची मागणी असून त्यापैकी ४३ लाख १४ हजार ८२२ रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे पाणीपट्टी कर वसुलीचे प्रमाण ६०.४९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. थकीत पाणीपट्टी कराची मागणी ३४ लाख ९२ हजार ३६३ रुपये असून त्यापैकी ११ लाख ६० हजार ८२० रुपये वसूल झाले आहेत. चालू वर्षाच्या ४४ लाख ५८ हजार रुपयांच्या मागणीपैकी ३१ लाख ५६ हजार ४०२ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.