

शिराळा शहर : तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या करमाळे (ता. शिराळा) गावाला यंदाच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या पाझर तलाव क्रमांक १ मध्ये पुन्हा पाणी साचू लागल्याने गावाच्या पाणीपुरवठा विहिरीला नवसंजीवनी मिळाली आहे. सुमारे ९० टक्के पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे करमाळेची पाणीटंचाई दूर होण्याची आशा बळावली आहे.
गाळाने भरलेल्या जुन्या तलावाच्या जागी नवीन साठवण तलाव उभारण्यास शासनाने मंजुरी दिली होती. काम सुरू असताना तलावाखालील मुख्य विहिरीतील पाण्याची आवक कमी झाल्याने ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागले. मात्र विकासकामासाठी ग्रामस्थांनी संयम राखत प्रशासनाला सहकार्य केले.
यंदा पावसाने साथ दिल्याने अपूर्ण अवस्थेतील तलावातही पाणी साचू लागले असून विहिरीची पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. संकटकाळात शेजारील निगडी गावाने आपल्या तलावातील पाणी करमाळेच्या विहिरीत सोडून ग्रामस्थांची तहान भागवली.