

मिरज : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मिरज-कोल्हापूर, मिरज-पुणे आणि मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गावर रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिरज रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या मिरज, कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, वाठार आणि लोणंद या रेल्वे स्थानकांवरून दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. या स्थानकांवर वारकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांच्या व वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलिसांनी चोख नियोजन केले आहे.
मिरज रेल्वेचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ३ अधिकारी, ५५ पोलिस अंमलदार आणि ४५ होमगार्ड्सची या बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसर आणि धावत्या गाड्यांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच गर्दीचा गैरफायदा घेऊन वारकऱ्यांच्या साहित्याची अथवा दागिन्यांची चोरी होऊ नये, यासाठी हा विशेष बंदोबस्त २४ तास कार्यरत राहणार आहे.