Education News : शिक्षणाच्या शर्यतीत सांगली जिल्हा राज्यात पाचवा

केंद्र सरकारच्या मूल्यमापन अहवालातील माहिती; देशात काेल्हापूर प्रथम
Education
EducationPudhari
Published on
Updated on

निखिल रोकडे

नाशिक : देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यांचे मूल्यमापन करणारा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा शैक्षणिक कामगिरी निर्देशांक (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स पीजीआय २०२५) अहवाल २०२५ जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सांगली जिल्हा राज्यात पाचव्या स्थानावर आहे.

कोल्हापूरने प्रचेस्ता-१ श्रेणीत ६०० पैकी ४६३ गुण मिळवत देशातील ७८२ जिल्ह्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. पंजाबमधील बर्नाला (४६१ गुण) आणि मुक्तसर (४५६ गुण) या जिल्ह्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकविला आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या स्पर्धेत कोल्हापूरने देशात अव्वल झेप घेतल्याने महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राने देशात सातवे स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राचा विचार करता दुसऱ्या क्रमांकावर सातारा जिल्हा आहे. सांगली जिल्हा ३७२ गुण मिळवून राज्यात पाचव्या स्थानावर आहे.

परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय) दरवर्षी जाहीर केला जातो. देशातील राज्ये आणि जिल्ह्यांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, पायाभूत सुविधा आणि प्रशासन यांचे मूल्यमापन करून शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा घडवून आणणे हा या अहवालाचा उद्देश आहे. यूडायस प्लस प्रणाली, राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण, शाळांची माहिती आणि विविध शैक्षणिक निकषांच्या आधारे हा निर्देशांक निश्चित केला जातो.

logo
Pudhari News
pudhari.news