

मिरज : शिपूर (ता. मिरज) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीत कर्नाटक (शिरूर) येथील बाळू हजारे यांच्या 'सुलतान' व पाचगाव येथील संभाजी गाडगीळ यांच्या 'आरएक्स बैज्या' या बैलजोडीने जनरल गटात प्रथम क्रमांक पटकावला. या मानाच्या जोडीस २ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि 'जनसुराज्य केसरी' पदक देऊन गौरविण्यात आले. शिपूर येथील खंडोबा यात्रा आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. .
मैदानात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह शेजारील कर्नाटक राज्यातील तब्बल ११२ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, आमदार अशोक माने, शिवसेनेचे मोहन वनखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पक्ष आणि युवा नेतृत्वाची मोठी संधी : आमदार डॉ. विनय कोरे
आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, जनसुराज्य शक्ती हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार आहे. हा विचार युवकांमध्ये रुजविण्याचे कौतुकास्पद काम प्रदेशाध्यक्ष समित कदम करत आहेत. आमचा पक्ष राज्यात महायुतीचा एक महत्त्वाचा घटक पक्ष असून, आगामी काळात युवा नेतृत्वाला काम करण्याची चांगली संधी मिळणार आहे