Sangli Crime : सांगलीत कायदा, सुव्यवस्थेचे 'धिंडवडे'

टोळी युद्धातून मुडदे : पोलिस नेमके कशात व्यस्त? संघटित गुन्हेगारी मोडित काढण्याची सांगलीकरांची माफक अपेक्षा
Sangli Crime News
Sangli Crime News
Published on
Updated on

स्वप्निल पाटील

सांगली : सांगली शहरात हद्दपार व मोक्कातून सुटलेल्या काही गुन्हेगारांचे कारनामे भलतेच वाढले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत सांगलीकरांची चिंता वाढली आहे. कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याची लोकभावना आहे. टोळ्यांतील वर्चस्ववाद, जुने वाद आणि त्यातून दिवसाढवळ्या हत्या, खून यामुळे पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवर संशय निर्माण होतो. कारवाईचा केवळ फार्स दाखवणार्‍या पोलिसांचा वचक सांगलीमध्ये कधी निर्माण होणार?

गुन्हा घडल्यानंतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाते. मात्र, गुन्हे घडूच नयेत यासाठी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याची भावना नागरिकांत आहे. खून, हत्येनंतर आरोपींच्या घरांवर हल्ले, सार्वजनिक ठिकाणी कोयते घेऊन फिरणारे युवक आणि त्यानंतर वाढवलेला पोलिस बंदोबस्त यामुळे भीतीचे वातावरण संपत नाही. एक खून झाला की दुसऱ्या खुनाची बातमी येते.

पोलिस म्हणतात बहुतांश खून वैयक्तिक वादातून होतात. हे काही प्रमाणात खरेही आहे. पालकमंत्रीही म्हणतात, पोलिस काय प्रत्येकाच्या घरात डोकावून पाहणार का? हा युक्तिवाद झाला, त्यामुळे भयमुक्त समाज निर्मितीची जबाबदारी कशी टाळणार ? अलीकडील काही घटना टोळी संघर्षातून होत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाईची निकड वाढतेच आहे. आता पडत असणारे मुडदे हे टोळी युद्धातून पडत आहेत. याचे काय? हे तरी पोलिस, मंत्रिगण मान्य करणार की नाही?

गुन्हेगारांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय

नामचीन गुंडानी प्यादी तयार करून गुन्हेगारी जगतात वर्चस्वाचा प्रयत्न

एखादा दुसरा मुडदा पाडला की भुरटा गुन्हेगारही स्वतःला भाई समजू लागतो.

भुरट्या गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांचे 'ठोस' , ‘रामबाण’ उपाय आहेत. ते राबविण्यास काही पोलिस अधिकारी खमके आहेत. त्यांना गरज आहे ती ‘ग्रीन सिग्नल’ची.

गुन्हेगारांविरुद्ध ठोस भूमिका घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांचे हात शिवशिवतात, तर काहीजणांचे हात कोणत्या ‘अर्थपूर्ण’ दोरखंडाने बांधले जातात?

पूर्वी कोयता हल्ला म्हणजे फार मोठी घटना, आता भुरटे गुन्हेगार सर्रास कोयता घेऊन फिरतात.

पोलिसांसमोर कोयता घेऊन धिंगाणा

स्वामी समर्थ घाटावर ज्या तरुणाची हत्या झाली त्याचा एक नातेवाईक हातात कोयते घेऊन घटनास्थळी दाखल झाला. काही पोलिस लागलीच घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी मोठा जमावदेखील जमला. त्यानंतरही या सर्वांसमोर तो कोयते नाचवत धिंगाणा घालत होता.

मनात आणले तर... अशक्य ते शक्य करतील पोलिसमामा

मिरज शहरात चार महिन्यांपूर्वीच काही टोळ्यांनी उच्छाद मांडला होता. सुरुवातीला किरण रासकर आणि त्यानंतर किरण चौगले या दोन खमक्या अधिकार्‍यांनी मिरज शांत केले. राजकीय पाठबळ असतानाही भल्याभल्यांचे कंबरडे मोडण्याचे काम मिरज पोलिसांनी केले. मिरजेत टोळ्या तर सोडाच, एकाने कोयता घेऊन फिरला म्हणून त्याला काळा-निळा केला, गुन्हेगार नको-नको म्हणेपर्यंत पोलिसांनी हाणला. मग हे सांगलीत का होत नाही?

हात बांधल्यावर कसे लढायचे ?

सांगलीत नुकतेच गुंडाविरोधी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाला पूर्ण मोकळीक नाही. हे पथक स्थानिक गुन्हे अन्वेषणचेच आहे. हात बांधल्यावर कसे लढायचे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news