

सांगली : हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉट परिसरात शॉर्टसर्किटमुळे राहत्या घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत शंकर बापू खांडेकर यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान अभिजित पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, खांडेकर यांचे घर अरुंद रस्त्यावर असल्याने अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अडचणी आल्या. त्यामुळे जवानांनी वॉटर फायर बुलेटच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जवानांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.