

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांशी संबंधित संस्था, नातेवाईक आणि थेट संचालकांनी घेतलेली कोट्यवधी रुपयांची कर्जे परतफेड न करता माफ करून घेतल्याचे नाबार्डच्या तपासणीत उघडकीस आले आहे. याची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. सध्या सुरू असलेल्या बँकेच्या नोकरभरतीलाही स्थगिती येऊ शकते. त्यामुळे बेरोजगार तरुण व पालकांनी आपली आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आरबीआयने पाठवलेल्या नोटीसमध्ये अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे. ३१ मार्च २०२५ रोजीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे नाबार्डने केलेल्या वैधानिक तपासणीत हे गैरप्रकार समोर आले आहेत. त्यानुसार बँकेच्या संचालकांना तसेच त्यांच्याशी संबंधित संस्था, कारखाने, सूतगिरण्या आणि नातेवाइकांना नियमांचे उल्लंघन करून कोट्यवधीची कर्जे दिली आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, यातील अनेक कर्जे आरबीआयची परवानगी न घेता बँकेने परस्पर माफ केली आहेत. मूळ कर्जे थकीत असतानाही काही संचालकांनी ५० कोटींपासून २५० कोटींपर्यंत बेकायदेशीर कर्जे उचलल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. कायद्यानुसार संचालक किंवा त्यांच्या नातेवाइकांना अशी कर्जे देता येत नाहीत, तरीही ती देऊन माफ करून घेण्यात आली आहेत.
तसेच बँकेची १,६३८ खाती निष्क्रिय झाली होती. या खात्यांची कोणतीही 'केवायसी' न करता ती पुन्हा कार्यान्वित केल्याचे उघड झाले आहे. आरबीआयने १५ जुलैपर्यंत बँकेला यावर लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले असून, उत्तर समाधानकारक नसल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आ. पडळकर म्हणाले, सलग दहा वर्षे सेवा झालेल्या संचालकांना सक्तीची तीन वर्षे विश्रांती देऊन त्यानंतरच निवडणूक लढवण्याचा सुधारित कायदा आला आहे. या संदर्भात २५ मे रोजी सहकार आयुक्तांनी पत्रही काढले आहे. परंतु, बँकेने २० मे रोजी संचालक मंडळाची बैठक दाखवून नोकरभरतीचा ठराव घुसडला आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद असून, नोकरभरतीसाठी नियुक्त केलेली कंपनी पारदर्शक पद्धती वापरणार असतानाही काही संचालक पैसे गोळा करत असल्याच्या चर्चा आहेत. या नोकरभरतीला येत्या काही दिवसांत स्थगिती मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या गैरव्यवहारामुळे बँकेवर प्रशासकही येऊ शकतो, त्यामुळे पालकांनी संचालकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.