

आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील अहिल्यादेवी होळकर चौक परिसरातून 'सुलतान' नावाचे गाढव चोरून नेल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनोख्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लखन बापू जाधव (वय ३७, व्यवसाय- गाढव हाकणे, रा. करगणी) यांचे 'सुलतान' नावाचे गाढव १० मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अहिल्यादेवी होळकर चौक परिसरातून गायब झाले होते. लखन जाधव यांनी सर्वत्र शोध घेऊनही गाढव सापडले नाही. अखेर आपल्या संमतीशिवाय गाढव लबाडीने चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून संशयित मिथून लहू पवार (रा. भोसले सावळज नगर, ता. तासगाव) याच्याविरुद्ध मंगळवारी (दि. १६) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.