Sangli News| रुग्णालय महापालिकेचे, कर्मचारी मात्र कंत्राटदाराचे?

रुग्णसेवेलाही आऊटसोर्सिंगचा विळखा : पदभरती महापालिकेच्या निवड समितीमार्फत होणार का?
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिकेने वारणाली येथे उभारलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी भरतीच्या निमित्ताने आऊटसोर्सिंगच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालय महापालिकेचे, पायाभूत सुविधा महापालिकेच्या आणि जबाबदारीही महापालिकेची; मग रुग्णसेवेशी थेट संबंधित कर्मचारी कंत्राटदाराचे, हे कितपत संयुक्तिक होईल. विशेषतः डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या मानधनावर किंवा कायम सेवेत नियुक्ती होणे गरजेचे आहे. मात्र आऊटसोर्सिंगशिवाय पर्यायच नसेल तर होणारी पदभरती ही तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या निवड समितीमार्फत होणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १०८ पदे भरावी लागणार आहेत. त्यापैकी ३८ पदांना राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मान्यता मिळालेली आहे. या पदांवर नियुक्त होणारे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासन अनुदान मिळणार आहे. ही पदे आऊटसोर्सिंगद्वारे भरली जाणार आहेत. उर्वरित ७० पदे भरण्याबाबतचे धोरण महासभेत निश्चित होईल. ही ७० पदेही आऊटसोर्सिंगद्वारे भरली जातील, असे दिसत आहे.

महापालिकेने यापूर्वी घंटागाडीवरील चालकांची भरती आऊटसोर्सिंगद्वारे केली होती. मात्र, या कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून कमी पगार मिळणे आणि अन्य तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. उद्यान विभागाकडील बाग कर्मचाऱ्यांबाबतही अशाच स्वरूपाच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी नियुक्तीचा अनुभव वादग्रस्त ठरलेला आहे. खरे तर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटदारामार्फत करणे कितपत योग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, तांत्रिक कर्मचारी आणि रुग्णसेवेशी थेट संबंधित पदांवरील कर्मचाऱ्यांना सेवेत स्थैर्य असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या मानधनावर किंवा कायम सेवेत त्यांची नियुक्ती झाल्यास वारंवार कर्मचारी बदलण्याचे प्रकार टाळता येतील. कंत्राटदारामार्फत होणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी सेवा पुरवठ्यातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. वेतनाबाबतचे प्रश्न आणि सेवाशर्तींची असुरक्षितता यांचाही रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रुग्णालयातील प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता आणि कौशल्य निश्चित करून त्यानुसारच भरती होणे गरजेचे आहे. कारण रुग्णालयाचे कामकाज हे थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे. अपात्र किंवा अपुरे कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यास रुग्णसेवेच्या दर्जावर परिणाम होण्याबरोबरच दैनंदिन कामकाजातही अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केवळ आऊटसोर्सिंग एजन्सीची नियुक्ती करून कर्मचारी उपलब्ध करून घेणे, एवढ्यापुरती ही प्रक्रिया मर्यादित राहू नये. घंटागाडी आणि उद्यान विभागातील भरतीवेळी आलेल्या तक्रारींचा अनुभव लक्षात घेता, वारणाली रुग्णालयाच्या कर्मचारी भरतीसाठी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. कंत्राटी भरतीची निविदा प्रक्रिया राबविण्यापूर्वी महासभेसमोर स्वतंत्र विषयपत्र ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.