

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाकडून झालेल्या नियोजनातील गंभीर उणिवा समोर आल्या आहेत. मतदार यादीतील घोळ, प्रभाग रचनेतील विसंगती आणि माहितीच्या अभावामुळे मतदारांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मतदानाच्या उत्साहावर विरजण पडले. याचा थेट फटका मतदानाच्या टक्केवारीला बसल्याची चर्चा आहे.
निवडणुकीत सर्वात मोठा गोंधळ मतदार यादीत पाहायला मिळाला. अनेक मतदार ज्या प्रभागात वास्तव्यास आहेत, त्याऐवजी त्यांची नावे दुसऱ्याच किंवा लांबच्या प्रभागात गेल्याचे दिसून आले. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आल्याने मतदारांची चांगलीच धावपळ झाली. आम्ही राहतो एका प्रभागात आणि मतदान करण्यासाठी दोन-तीन किलोमीटर लांब जावे लागत आहे, हा प्रशासनाचा कसला कारभार?, असा संतप्त सवाल मतदारांनी उपस्थित केला.
प्रशासनाने जर वेळीच लोकांमध्ये जनजागृती केली असती आणि माहितीचा फलक लावून पारदर्शकता जपली असती, तर मतदानाचा टक्का निश्चितच वाढला असता. केंद्रांवरील सोयी-सुविधांचा अभाव आणि माहितीचा गोंधळ यामुळे सामान्य मतदाराने घराबाहेर पडण्याऐवजी घरी बसणेच पसंत केल्याचे चित्र काही भागात दिसले.
प्रशासनाचा अनागोंदी कारभार : जयंत पाटील
सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत प्रशासकीय नियोजनाचा बोजवारा उडाला. निवडणूक आयोगाच्या डोळ्यादेखत आचारसंहितेची पायमल्ली झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी केला. सांगलीवाडी, सांगली शहर आणि मिरज परिसरातील विविध मतदान केंद्रांना पाटील यांनी भेट दिली. उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. ज्यामुळे मतदानाचा वेग मंदावला. प्रशासनाचा हा कारभार अत्यंत अनागोंदी असून, यामुळे सामान्य मतदारांचा वेळ आणि उत्साह वाया गेला आहे.
सत्ताधारी उमेदवारांकडून अनेक ठिकाणी आचारसंहितेचे उघड उल्लंघन होत असताना निवडणूक आयोग गप्प आहे. या निवडणुकीत काही उमेदवारांनी आपल्या संपत्तीचे आणि पैशाचे जे प्रदर्शन केले, त्याबाबत जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, या निवडणुकीत काही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात संपत्तीचे प्रदर्शन करण्यात आले. अशा कृत्यांमुळे महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक प्रतिमा डागाळली जात आहे.