

सांगली : वाढीव घरपट्टीविरोधात पालकमंत्र्यांसोबत कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल. सर्व प्रयत्नांमधूनही मार्ग न निघाल्यास जिल्हा व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यत येईल, तसेच महापौर, विरोधी पक्षनेते, आयुक्त यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
वाढीव घरपट्टीच्या प्रश्नाबाबत कृती समितीची शुक्रवारी बैठक झाली. बैठकीत उपस्थित नागरिकांनी केलेल्या सूचना, हरकती आणि पुढील आंदोलनाची दिशा, यावर चर्चा करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात विशेष मोहीम राबवून नागरिकांनी वाढीव घरपट्टी भरू नये, याबाबत जनजागृती करण्याचे निश्चित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना भेटू
उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वाढीव घरपट्टीचा प्रश्न मांडण्याचे ठरले. याशिवाय, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्यापक बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्व प्रयत्नांमधूनही मार्ग निघाला नाही, तर पुढील टप्प्यात आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेते यांच्या निवासस्थानासमोर रात्री १० ते १२ या वेळेत 'झोपमोड आंदोलन' करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात खटल्याची पूर्वतयारी सुरू आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस कृती समितीचे सतीश साखळकर, हणमंत पवार, एस. के. पाटील, वि. द. बर्वे, आसिफ बावा, युनूस महात, सलीम पन्हाळकर, किरण कांबळे, गजानन मिरजे, नितीन मिरजकर, रफिक महात, प्रा. जहांगीर तांबोळी, विलास घाडगे, ओमकार माने, शशिकांत गायकवाड, संगीता शिंदे, रेहाना शेख आदी उपस्थित होते.