Sangli News : उच्चदाब वीजवाहिनीचा डंपरला स्पर्श झाल्याने कोकळेतील एकाचा मृत्यू

डंपरमधून माती टाकण्याचे काम करत असताना घटना
Electric shock
उच्चदाब वीजवाहिनीचा डंपरला स्पर्श झाल्याने कोकळेतील एकाचा मृत्यू
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे डंपरमधून माती टाकण्याचे काम सुरू असताना वरून गेलेल्या उच्चदाब वीजवाहिनीचा डंपरला स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संकेत रामचंद्र माने (वय २७, रा. मोघमवाडी) असे मृताचे नाव असून तो कोकळे गणाच्या पंचायत समिती सदस्या वैशाली माने यांचा मुलगा आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत माने हे स्वतःचा डंपर घेऊन कोकळे गावच्या हद्दीत शेतात माती टाकण्यासाठी गेले होते. डंपर पाठीमागे घेऊन माती खाली रिकामी करत असताना डंपरचा वरील भाग तेथून गेलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या तारेला घासला गेला. यामुळे संपूर्ण डंपरमध्ये विजेचा प्रवाह पसरला. त्यावेळी डंपरमध्ये संकेत एकटेच असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच चुलत भाऊ शरद माने यांनी त्यांना तातडीने कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

संकेत माने यांच्या निधनाची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, पंचायत समिती सभापती सिंधू पाटील, वामन कदम, दादासाहेब कोळेकर, महेश पवार आदींनी रुग्णालयात धाव घेतली. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news