

हरिपूर : हरिपूर-कोथळीदरम्यानच्या नवीन पुलामुळे कृष्णा नदीपलीकडील गावांचा सांगलीशी संपर्क सुलभ झाला आहे. या पुलामुळे हरिपूरच्या वैभवात भर पडली आहे, मात्र निष्काळजी वाहनधारक, तळीरामांचा ठिय्या, चोरट्यांच्या उपद्रवामुळे वाहनधारक, ग्रामस्थ त्रस्त आहेत. पुलावर पथदिवे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
नव्या पुलामुळे कृष्णा नदीपलीकडील गावांमधील ग्रामस्थांचा अंकलीकडून होणारा फेरा वाचला आहे. पंधरा-सोळा किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच किलोमीटरवर आले आहे. यामुळे कोथळी-हरिपूर पुलावरून चोवीस तास वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, पुलावर रात्रीच्या वेळी पथदिव्यांची सोय नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. रात्रीच्या वेळी येथे मद्यपींचा वावर असतो. याचाही वाहनधारकांना त्रास होतो. पुलाच्या बाजूला असलेच्या लोखंडी कठड्यांच्या पाईप चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
पुलावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणे धोकादायक ठरत आहेत. वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. अंधारात कुत्रे, तसेच अचानक समोर आलेल्या मोकाट जनावरांना चुकविताना अपघाताचे प्रकार अनेकदा घडले आहेत. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पुलावर पथदिवे, तसेच सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.