

सांगली : वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर भाडेकराराने चालविण्यास देण्याचा प्रस्ताव, संत दासराम केळकर महाराज व्यापारी संकुलातील तीन गाळे राजारामबापू पाटील सहकारी बँकेला विक्रीने देण्याचा विषय आणि वाढीव घरपट्टीचा प्रश्न, या तीन मुद्द्यांवर सोमवार, २० जुलै रोजी महासभेत जोरदार चर्चा, खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, १७ रोजी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांच्या स्वतंत्र पक्ष बैठका होणार आहेत. वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा विषय महासभेपुढे आहे. या प्रस्तावाला अनेकांनी विरोध केला आहे.
वाढीव घरपट्टीविषयी असंतोष
भांडवली मूल्याधारित घरपट्टी आकारणीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोषही महासभेत प्रतिबिंबित होईल, असे दिसत आहे. हा मुद्दा सभागृहात गाजण्याची चिन्हे आहेत.
भाजप नगरसेवकांची भूमिका काय?
आमदार सुधीर गाडगीळ यांनी नुकतेच महापालिकेतील बैठकीत हे हॉस्पिटल पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर भाडेकराराने चालविण्यास देण्यात येणार नसून ते महापालिकाच चालवणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे.
या बैठकीला स्थायी समितीचे सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी तसेच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते, पण महापौर धीरज सूर्यवंशी उपस्थित नव्हते.
महापौर सूर्यवंशी यांनी या विषयावर सभागृहाचा कल जाणून घेतल्यानंतर निर्णय होईल, अशी सूचक भूमिका घेतली. त्यामुळे या प्रश्नावर भाजपमध्ये एकमत आहे का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
संत दासराम केळकर महाराज व्यापारी संकुलातील तीन गाळे राजारामबापू पाटील सहकारी बँकेला विक्रीने देण्याच्या प्रस्तावावरही विविध मते आहेत. आ. गाडगीळ यांनी या गाळ्यांची विक्री होणार नाही, ते भाडेतत्त्वावरच राहतील, असे म्हटलेले आहे. आता भाजप नगरसेवकांची भूमिका काय ?