Sangli News : वाढीव घरपट्टीच्या तक्रारींसाठी अखेर समिती स्थापन

पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा समावेश
Sangli Municipal Corporation
सांगली महापालिकाPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : भांडवली मूल्यावर आधारित पद्धतीनुसार घरपट्टी आकारणी तसेच घरपट्टी वाढीबाबत नागरिकांच्या अडचणी, समस्या, तक्रारी व सूचना यांचा अभ्यास करून त्याबाबत आवश्यक समन्वय साधणे, तक्रारींचे परीक्षण करणे, महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार आवश्यक त्या शिफारशी करण्यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

घरपट्टीसंदर्भात विविध संघटनांच्या तक्रारींचा ओघ सुरू झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्तीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्त संजीता महापात्र यांनी समिती नियुक्त केली आहे. महापौर धीरज सूर्यवंशी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीत उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, सभागृह नेते संदीप आवटी, तसेच सर्व पक्षांचे गटनेते, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहायक आयुक्त (मालमत्ता व कर विभाग) यांचा समावेश आहे.

भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर आकारणीसंदर्भातील अडचणी, समस्या, तक्रारी व सूचना यांचा अभ्यास करणे व प्राप्त हरकती व तक्रारींचे परीक्षण करून त्यावर आवश्यक उपाययोजना सुचवणे. तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये आवश्यक समन्वय साधणे हे समितीचे मुख्य कार्य आहे. ही समिती महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार महासभेच्या अधिकार क्षेत्रातील धोरणात्मक बाबींवर आवश्यक त्या शिफारशी करेल. आवश्यकतेनुसार समितीच्या बैठका घेऊन त्यातील निर्णय व शिफारशी महानगरपालिका प्रशासनास सादर करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news