तासगाव : येथील एसटी आगाराचा कारभार नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण नसल्याने आगाराचा कारभार वादग्रस्त ठरतोय. चालक, वाहक याना ड्युटी लावताना वशिलेबाजी होत असल्याने त्याचा थेट परिणाम आगाराच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक चाक दिवसेंदिवस गाळात अडकत चालले आहे.
घडलेली घटना अशी : तासगाव आगाराची तासगाव - सांगली व परत सांगली - तासगाव ही बस फेरी वेळेत सुटली नाही. त्यामुळे सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटाने सुटणारी ही बस एकेदिवशी वेळेत सुटली नाही. या बसच्या वाहक व चालकाने या ड्युटीपूर्वी सकाळी ड्युटी केली होती. मात्र ड्युटी लावणाऱ्या वाहतूक निरीक्षकाने याच चालक, वाहकाला ओव्हर टाइम म्हणून त्यांनाच या दोन फेऱ्यांची ड्युटी करण्यास भाग पाडले. परिणामी तासगाव - सांगली व सांगली - तासगाव ही फेरी होईपर्यंत बसला एक तास उशीर झाला. त्यामुळे सव्वा पाच वाजता सुटणारी तासगाव-कराड ही बस एक तास उशिरा सुटली. त्यामुळे या मार्गावर प्रतिसाद अतिशय कमी मिळाला.
तासगाव - सांगली व तासगाव - कराड हा परतीचा प्रवास करताना बस अल्प प्रवाशांना घेऊन धावली. तासगाव - कराड तसेच परत त्याच मार्गाने येणाऱ्या या बसच्या वेळेत तासगाव आगाराचा नाशिक - तासगाव, बोरिवली - तासगाव व पुणे - तासगाव या बसेस कराडमधून पाच-दहा मिनिटाच्या फरकाने कराड - तासगाव मार्गावर धावत होत्या. त्यामुळे तासगाव- कराड ही बस रिकामीच धावली असल्याचे समोर आले.
एक उदाहरण असे...
तासगाव - सांगली व परत सांगली - तासगाव , तर तासगाव - कराड, कराड- तासगाव या दोन फेऱ्या केल्याने या बस फेऱ्यातून आगाराला अवघे २८८५ रुपयांचे उत्पन्न मिळाले हे जरी खरे असले तरी या जादा बस फेरीसाठी या बसच्या चालक आणि वाहकाला तब्बल ४४०० रुपयांचा भत्ता द्यावा लागला हे या ढिसाळ कारभाराचे उदाहरण.