

सांगली ः एसटीच्या येथील विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सांख्यिकी विभागातील वरिष्ठ लिपिकाला पीडितेच्या नातेवाईकांनी कार्यालयातच चपलेने बेदम चोप दिला. या प्रकारानंतर सांगली शहर पोलिसांनी संशयित लिपिक विनायक कदम (रा. विजयनगर) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरा पीडित महिलेने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आणि पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एसटीच्या विभागीय कार्यालयात कार्यरत आहे. संशयित वरिष्ठ लिपिक विनायक कदम हा गेल्या अनेक दिवसांपासून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत होता. वरिष्ठ पदावरील व्यक्तीकडून होत असलेल्या या त्रासामुळे पीडित महिला प्रचंड मानसिक दबावाखाली होती. अखेर तिने हा सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला.
दरम्यान, 16 मे 2026 रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास संशयित कदम हा पीडित महिलेकडे गेला. त्याने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारामुळे पीडिता कमालीची घाबरली. तिने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली. परंतु तक्रारीची दखल घेतली न गेल्याने नातेवाईक संतप्त होते.
सोमवारी विभागीय कार्यालयात एसटीच्या 78 व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा सुरू होता. सर्व अधिकारी व कर्मचारी तिथे जमले होते. हा कार्यक्रम संपताच पीडितेच्या नातेवाईकांनी थेट कार्यालयात प्रवेश करून विनायक कदम याला जाब विचारला. नातेवाईकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी कार्यालयातच कदमला लाथा-बुक्क्यांनी, चपलेने बदडून काढले. यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांना बाजूला केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने धाव घेत कदमला ताब्यात घेतले.