Sangli News : पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत मोरणा धरण परिसर

डोंगरी शिराळा तालुक्याला रोजगाराची नवी दिशा मिळणार कधी?
Morna Dam
Morna Dam
Published on
Updated on

शिराळा शहर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला डोंगरी शिराळा तालुका नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असला, तरी उद्योगधंद्यांचा अभाव आणि रोजगाराच्या मर्यादित संधी ही येथील मोठी समस्या आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या अनेक युवकांना रोजगारासाठी परमुलखात स्थलांतर करावे लागते. अशा परिस्थितीत मोरणा धरण परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने नियोजनबद्ध विकास झाल्यास तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. मात्र, या विषयावर आजपर्यंत केवळ चर्चाच झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

गतवर्षी शिराळा तहसील कार्यालयात झालेल्या जिल्हा विकास आराखडा बैठकीत मोरणा धरण परिसरात बोटिंग, पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि स्थानिकांना रोजगार देणारे विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. या प्रस्तावाला लोकप्रतिनिधी व प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, त्यानंतर स्वतंत्र आराखडा, निधी किंवा अंमलबजावणीबाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही.

पावसाळ्यात मोरणा धरण परिसरातील नयनरम्य जलाशय, हिरवाईने नटलेले डोंगर आणि धुक्याने वेढलेले वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. मात्र सुरक्षित दर्शनस्थळे, बोटिंग, वाहनतळ, स्वच्छतागृहे, खाद्यपदार्थ केंद्रे, माहिती फलक व इतर आवश्यक सुविधा नसल्याने पर्यटनाचा अपेक्षित विकास होत नाही. पर्यटन प्रकल्प साकार झाल्यास स्थानिक

युवकांना मार्गदर्शक, बोट चालक, वाहन सेवा, स्थानिक खाद्यपदार्थ विक्री, बचतगट आणि हस्तकला व्यवसायातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यामुळे स्थलांतराला आळा बसण्याबरोबरच डोंगरी शिराळा तालुक्याच्या विकासालाही नवी गती मिळेल. त्यामुळे जिल्हा विकास आराखड्यातील पर्यटन संकल्पना आता कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news