

सांगली : स्टेशन चौक परिसरातील मोबाईल शॉपी फोडून चोरट्याने आतील 9 लाख 81 हजार 526 रुपयांचे मोबाईल लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी प्रेम दीपक खत्री (रा. आनंदी निवास, हेरंब पार्क, हरिपूर, ता. मिरज) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी प्रेम खत्री यांचे स्टेशन चौक ते आझाद चौक रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ लकी मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे ते रात्री 10 च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले.
दरम्यान, चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भिंतीस भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला. आतील विविध कंपन्यांचे सुमारे पावणेदहा लाख रुपये किमतीचे 60 मोबाईल घेऊन पोबारा केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी निदर्शनास आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.