

पलूस : शक्तिपीठ महामार्गाच्या बदललेल्या अलाइनमेंटमुळे सुपीक शेती धोक्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून कसला विकास करताय?’ असा सवाल आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत उपस्थित केला. बाधित शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवून प्रकल्पाची संपूर्ण माहिती तातडीने जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील अनेक जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून मोठा विरोध होत आहे. सुरुवातीला हा महामार्ग दुष्काळग्रस्त व कोरडवाहू भागातून नेण्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर दोन ते तीन वेळा अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आले आणि आता सांगली जिल्ह्यातील सुपीक व बागायती जमिनींमधून हा महामार्ग नेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
‘विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे पाप सरकारने करू नये. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करूनच विकासाची वाटचाल झाली पाहिजे, असे मतही डॉ. विश्वजित कदम यांनी सभागृहात व्यक्त केले.