

मिरज : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मिरजजवळ भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. महामार्गावर विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीची व आमदार गाडगीळ यांच्या मोटारीची समोरासमोर धडक झाली. अपघातात आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.
या भीषण अपघातात गाडगीळ यांच्या वाहनासह दुचाकीचा चक्काचूर झाला. तसेच गंभीर जखमी झालेल्या भारत पांडुरंग कोळी (वय ५६, रा. शिरोळ) यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी चालक गणपती विजय दरेकर यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आमदार सुधीर गाडगीळ हे कर्नाटकातील उगार खुर्द येथे कामानिमित्त गेले होते. ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सांगलीकडे परतत होते. त्यांची मोटार नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मिरजजवळ आली. यादरम्यान ढवळी (ता. मिरज) येथे शिक्षक म्हणून काम करणारे भारत कोळी हे त्यांच्या दुचाकीवरून शिरोळकडे निघाले होते. परंतु रस्ता चुकल्याने ते राष्ट्रीय महामार्गावर अर्जुनवाड फाट्यापासून थोडे पुढे गेले. यामुळे अर्जुनवाडमार्गे जाण्यासाठी ते महामार्गावर विरुद्ध दिशेने वेगाने येत होते. यावेळी कोळी यांच्या दुचाकीची आमदार गाडगीळ यांच्या मोटारीशी समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघात इतका भीषण होत की, आमदार गाडगीळ यांच्या मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. दुचाकीची धडक बसताच मोटारीच्या एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे आमदार सुधीर गाडगीळ, त्यांचे अंगरक्षक, स्वीय सहायक, चालक, छायाचित्रकार, असे सर्व बचावले. परंतु मोटारीचा डॅशबोर्ड फुटल्याने गाडगीळ यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. दुचाकीस्वार भारत कोळी यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी कोळी यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिरज शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
ईश्वराच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली..
अपघातानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी ‘ईश्वराच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली’, अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली. तसेच स्वीय सहायक, अंगरक्षक, छायाचित्रकार, वाहनचालक हे सर्व सुखरूप आहेत. उपचार करून मला घरी सोडले असून प्रकृती स्थीर असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.