

सांगली : महापालिकेत पगार वितरण प्रक्रियेत झालेल्या हयगयीमुळे प्रभाग समिती क्रमांक दोनमधील १७५ कर्मचाऱ्यांना डबल पगार मिळाला. त्यांच्या खात्यावर सुमारे ४३ लाख रुपयांचा पगार दोनदा जमा झाला. ही चूक लक्षात येताच प्रशासनाने तत्काळ हालचाली करून १७० कर्मचाऱ्यांना जादा गेलेली रक्कम परत मिळविण्यात यश मिळविले. संबंधित दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेचे सुमारे ४० विभाग असून बावीसशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक महिन्याला विविध विभागांकडून लेखा विभागाकडे पगारपत्रके सादर केली जातात. सर्व विभागांची पगारपत्रके एकाच वेळी प्राप्त होत नसल्याने टप्प्या-टप्प्याने पगाराची बिले तयार करून धनादेश काढले जातात. या प्रक्रियेदरम्यान प्रभाग समिती क्रमांक दोनमधील १७५ कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक एकदा समाविष्ट झाल्यानंतर ते पुन्हा एकदा सादर झाल्याने त्याच कर्मचाऱ्यांच्या पगाराचे धनादेश दुसऱ्यांदा काढले गेले.
यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सुमारे ४३ लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम जमा झाली. मात्र ही चूक लक्षात येताच प्रशासनाने तातडीने बँक आणि संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कारवाई केली. त्यातून सुमारे १७० कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली अतिरिक्त रक्कम त्याच दिवशी परत घेण्यात यश आले. मात्र पाच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम त्यांच्या कर्ज खात्यांमध्ये समायोजित झाल्याने ती तत्काळ परत मिळू शकली नाही. या कर्मचाऱ्यांकडून जादा मिळालेली रक्कम पुढील पगारातून वसूल करण्यात येणार आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांतील तपासणी आणि नियंत्रण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.