

श्रीकांत मोरे
कुपवाड : कुपवाडमधील दत्ता पाटोळे आणि सांगलीतील १४ वर्षीय वेदांत बंडगर खून प्रकरणांमुळे गुन्हेगारी जगतात चर्चेत आलेला संशयित निलेश गडदे हा २०१९ पूर्वी महाविद्यालयीन जीवनात एक उत्कृष्ट 'कबड्डीपटू' म्हणून नावाजला जात होता. मात्र, वाद आणि चुकीच्या संगतीमुळे एक उमदा खेळाडू सराईत गुन्हेगार बनला.
बामणोली (ता. मिरज) येथील काही तरुणांशी झालेल्या बाचाबाचीनंतर त्याने कबड्डी सोडली आणि तो टवाळखोर मित्रांच्या संगतीला लागला. २०२० मध्ये गडदेचा वाघमोडेनगरमधील काही तरुणांशी वाद झाला होता. त्यावेळी दत्ता पाटोळे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. परंतु, पाटोळे यांनी मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून नीलेश गडदे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मिरज ते कुपवाड एमआयडीसी रस्त्यावर भरदिवसा दत्ता पाटोळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. या पहिल्या खुनापासूनच गडदे पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. पाटोळे खून प्रकरणात अटक झाल्यानंतर गडदेची रवानगी कारागृहात झाली होती. तिथे त्याची ओळख वेदांत बंडगर खून प्रकरणातील आणखी एक संशयित सागर चौगुले याच्याशी झाली आणि त्यांच्यात मैत्री वाढली. दत्ता पाटोळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला न्यायालयीन कामकाजात सागर माने हा तरुण मदत करत होता. याचा राग कारागृहात असलेल्या गडदेच्या मनात होता. याच रागातून गडदेच्या सांगण्यावरून, जामिनावर सुटलेला त्याचा साथीदार किरण लोखंडे याने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सागर मानेवर गोळीबार केला होता.
२०२५ मध्ये पाच वर्षांनंतर गडदे कारागृहातून जामिनावर बाहेर आला. दरम्यान, त्याचा साथीदार किरण लोखंडे याने कुपवाड व तासगावमधील एका शेअर घोटाळ्यातील पाटील नामक व्यक्तीचे खंडणीसाठी अपहरण केले होते. या प्रकरणात कुपवाड पोलिसांनी लोखंडेच्या टोळीला जेरबंद केले होते. त्यानंतर पुन्हा जामिनावर आलेल्या लोखंडेला संजयनगर पोलिसांनी एका कारवाईत अटक करून त्याच्याकडून सहा पिस्तुले जप्त केली होती.
नुकताच सागर माने एका नातेवाईकाच्या घरगुती कार्यक्रमासाठी चाणक्य चौकाजवळ आला होता. याची माहिती मिळताच संशयित नीलेश गडदे हा आपल्या साथीदारांसह सागर मानेवर पुन्हा जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, याची कुणकुण लागताच कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची गाडी पाहताच संशयित गडदे आणि त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. कुपवाड पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नीलेशने निवडणुकीत उमेदवाराच्या घरावर केला हल्ला
संशयित नीलेश गडदे याने महापालिका निवडणुकीत जानेवारी २०२६ मध्ये कुपवाडमधील एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर व्हाॅटसअप काॅल करून 'माझा मित्र किरण लोखंडे याला अडकविण्याचा प्रयत्न केल्यास, तुला व तुझ्या मुलाला जीवंत ठेवणार नाही ', अशी धमकी दिली होती. त्यावेळी संबंधित नगरसेवकाने संशयित गडदे याच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गडदे याने महापालिका निवडणुकीवेळी मिरजेतील वार्ड नंबर तीनमधील एका उमेदवाराच्या घरावर हल्ला करून त्या उमेदवाराच्या वाहनांची तोडफोड केली होती. याबाबत महात्मा गांधी पोलिस ठाण्यात संशयित लोखंडे व त्याचा मित्र अतुल वायदंडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गडदे व वायदंडे यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता.