.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कुपवाड : कुपवाड येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘गॅलेक्सी ॲल्युमिनियम एलएलपी’ कंपनीला आवश्यक असणारा कच्चा माल पुरवण्याचे आमिष दाखवून ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील इंदूर येथील ‘कट अँड क्राफ्ट स्टील इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या तीन व्यवस्थापकीय संचालकांवर कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहित राठोड, हर्षदीप सिंग आणि विशाल मोरे (सर्व रा. इंदूर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी उद्योजक दिलीप बर्गे यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी बर्गे यांची कुपवाड औद्योगिक वसाहतीत ‘गॅलेक्सी ॲल्युमिनियम एलएलपी’ नावाची कंपनी आहे. संशयित मोहित राठोड, हर्षदीप सिंग आणि विशाल मोरे यांनी काही दिवसांपूर्वी बर्गे यांची भेट घेतली होती. ‘तुमच्या कंपनीला लागणारा कच्चा माल पुरवतो’, असे सांगून त्यांनी बर्गे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २ फेब्रुवारी २०२६ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत गॅलेक्सी कंपनीसोबत ऑर्डर्स निश्चित करण्यात आल्या.
या व्यावसायिक व्यवहारापोटी संशयितांनी वेळोवेळी एकूण ७९ लाख ५ हजार ३०८ रुपये घेतले. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही कच्चा माल पाठवला नाही. त्यामुळे बर्गे यांनी संशयित राठोड, सिंग आणि मोरे यांच्याशी संपर्क साधून मालाची मागणी केली. मात्र, संशयितांनी माल पाठवण्यास वारंवार टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिलीप बर्गे यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.